उमराणे : चणकापूर उजवा कालव्याचे पूरपाणी परसूल धरणात सोडावे, यासाठी ग्रामस्थांची बैठक झाली. पूरपाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार डॉ. राहुल अहेर यांची भेट घेऊन पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली. चणकापूर उजव्या कालव्याचे पूरपाणी परसूल धरणात सोडावे यासाठी शिवाजी चौकात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविकेतून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. गाव व परिसरात सध्या खरीप पिकांची स्थिती पाण्याअभावी दयनीय झाली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट आहे. गावाला दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. धरणातील पाण्याचा साठा संपत आला आहे. शेती, जनावरे, पिण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. रामेश्वर धरणापासून पुढे कालव्याने टप्पाटप्प्याने पाणी देण्यात येत आहे. परसूल धरणाच्या वरच्या बाजूला राजदरवाडीला ८७ दशलक्ष घनफूटक्षमतेचे धरण मंजूर झालेले असल्याने भविष्यात परसूल धरणात पावसाचे पाणी पुरेशा प्रमाणात येण्याची शक्यता फारच कमी आहे. ही वस्तुस्थिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत देवरे यांनी लक्षात आणून दिली. हक्काचे पूरपाणी धरणात टाकण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे यांनी पाण्यासाठी राजकारणविरहित लढा देण्याची आवशक्यता नमुद केली. यावेळी पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे, बाळासाहेब देवरे, पंडित देवरे, बापु देवरे, माजी सरपंच दत्तू देवरे, राजेंद्र नीळकंठ यांनी मनोगतातून पाणीलढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. परसूल धरणात पूरपाणी टाकण्यासाठी आमदार डॉ. राहुल अहेर यांची देवळा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली़
परसूल धरणात पूरपाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 1:18 AM