पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस, विसापूर, बिजोरे, चाचेर, धनगरपाडा, भादवण, खामखेडा या गावांतील कालवा क्षेत्रातील विहिरींनी तळ गाठण्यास केली असून, सिंचन होत नसल्याने परिसरातील शेती शेती धोक्यात आली आहे. सुळे डाव्या कालव्याला पुनंदमधून आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकºयांना आजही कालव्यापासून फारसा लाभ झालेला नसल्याचे बोलले जात आहे. कालव्याला रब्बी हंगामासाठी वेळेवर दोन आवर्तन मिळावे या आशेवर परिसरातील शेतकरी आजही तग धरून असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. आवर्तन निश्चित करताना शेतकºयांना विश्वासात घेतले जात नसून, फक्त पाणीपट्टी भरून घेतली जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले. उशाशी धरणे असतानाही तालुक्यातील शेतकरी हक्काच्या पाण्याला मुकत आहे. पाण्याअभावी येथील शेती धोक्यात आली आहे. कालवा प्रशासनावर व लोकप्रतिनिधींवर शेतकºयांनाचा रोष वाढलेला असून, कालवा परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. संबंधित विभागाने सुळे डाव्या कालव्याचे दुसरे आवर्तन तत्काळ सोडावे अशी मागणी निवृत्ती जाधव, सुरेश जाधव, धनाजी जाधव, मार्कंड जाधव, सचिन वाघ, संदीप जाधव, राहुल आहेर, केवळ वाघ, कौतिक मोरे, प्रवीण जाधव, दादाजी जाधव, बाजीराव जाधव, बुधा जाधव, राहुल जाधव यांसह शेतकरी वर्गाने केली आहे. सुळे डावा कालव्याच्या पाणी वितरणाबाबत पाच ते सहा वर्षांपासून दुजाभाव होत आहे. शेतकºयांनी कालव्याला जमिनी देऊनही रब्बी हंगामासाठी दोन आवर्तन वेळेवर दिले जात नसल्याने शेतकरी निराश झाला आहे. ज्या ज्या वेळेस कालव्याला पाणी सोडले गेले, त्या त्या वेळेस पिळकोस-पर्यंत पाण्याचा फ्लो अत्यंत कमी होतो. आजपर्यंत जे आवर्तन दिले गेले ते कमी दिवसांचे दिले जात असल्याने शेतकºयांना या पाण्याचा सिंचनासाठी फारसा उपयोग झालेला नाही.
पुनंदमधून सुळे कालव्याला पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:26 AM