लासलगाव : शासनाने महाकृषी ऊर्जा अभियान व कृषी ऊर्जा पर्व या योजनेत सहभागी करून लासलगाव सह सोळागाव पाणी पुरवठा विभागाचा त्यात समावेश करावा व थकबाकीत सवलत द्यावी, अशी मागणी लासलगाव विंचुर सह १६ पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष व लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर यांनी केली आहे.बुधवारी (दि.१०) लासलगाव विंचुर सह १६ गाव पाणी पुरवठा समितीचे विज बिल थकबाकी बाबत विजवितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता प्रविण दरोली यांनी शासनाने महाकृषी ऊर्जा अभियान व कृषी ऊर्जा पर्व या योजनेची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीत सभा घेतली. त्यात शेतकरी वर्गास कृषी बिलाचे थकबाकी वसुली करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत प्रोत्साहित करावे व होणाऱ्या वसुलीतुन ग्रामपंचायतीस ३० टक्के अनुदान मिळवावे, असे दरोली यांनी सांगितले.
बैठकीस १६ गाव समिती माजी अध्यक्ष नानासाहेब पाटील, लासलगाव ग्रामपंचायत उपसरपंच अफजल शेख, कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड, उपकार्यकारी अभियंता प्रविण सोनवणे, लासलगाव शहर कक्षधिकारी धनवीज, ग्रामीण विभाग पल्लवी शिंदे, उपविभाग कल्पना गुरव, विस्तार अधिकारी सोनवणे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, पंचायत समिती सदस्य शिवाजी सुराशे, संजय पाटील, योगेश पाटील तसेच योजनेतील समाविष्ट गावाचे सरपंच सचिन दरेकर (विंचुर), मंगेश गवळी (ब्राम्हणगाव), तुकाराम गांगुर्डे (कोटमगाव), काशिनाथ माळी (पिं.नजिक) व सर्व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.