नाशिक : कांदिवली, मुंबई येथे दामूनगर झोपडपट्टीत गॅस गुदामला लागलेल्या आगीमुळे घडलेली दुर्घटना लक्षात घेऊन शिवसेनेने गंजमाळवरील पंचशीलनगर येथील झोपडपट्टीत असलेले मयूर गॅस एजन्सीचे गुदाम हटविण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, कांदिवली येथील झोपडपट्टीतील आगीमुळे मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी होऊन दोघांना जीव गमवावा लागला. अशा प्रकारची दुर्घटना गंजमाळवरील पंचशीलनगरातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंचशीलनगर झोपडपट्टीलगत मयूर गॅस एजन्सीचे सिलिंडरचे गुदाम असून, याठिकाणी मोठय़ा प्रमाणावर सिलिंडरचा साठा केलेला असतो. झोपडपट्टीत सुमारे आठ ते नऊ हजारांची लोकवस्ती आहे. याठिकाणी झोपडपट्टीला लागूनच मनपाच्या सार्वजनिक शौचालयाची सेफ्टीक टॅँक आहे. यापूर्वी सदर सेफ्टीक टाकीचा स्फोट होऊन जीवितहानी झालेली होती. सदर सेफ्टीक टाकीही धोकादायक असल्याने स्फोटक वस्तुंमुळे दुर्घटना घडू शकते. सदर गुदाम शहराबाहेर हलविण्यात यावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, उपविभाग प्रमुख नाना काळे यांनी दिला आहे.
पंचशीलनगरातील गॅस गुदाम हटविण्याची सेनेची मागणी
By admin | Published: December 13, 2015 10:34 PM