देवगाव : देवगाव फाटा त्रिफुलीची अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुरवस्था झाली. दरम्यान, वावी हर्ष-देवगाव-श्रीघाट रस्त्याचीही दैन्यावस्था झाली आहे. बांधकाम खात्याने दुरुस्तीकडे काणाडोळा केल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे.त्र्यंबकेश्वर-देवगाव-घोटी-वाडा या मार्गावरील देवगाव फाटा येथे असलेल्या त्रिफुलीला रात्री अंधारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचे दोन तुकडे होऊन पूर्णपणे तुटलेल्या स्थितीत आहे. तब्बल चार महिने उलटूनही दुरुस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.त्र्यंबकेश्वर-देवगाव-घोटी- वाडा या तिहेरी मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे या रस्त्याने ये-जा सुरु असते. त्रिफुलीच्या मोडक्या अवस्थेमुळे वाहनचालकांना अडचण येत आहे.काही वेळेस रस्ता लक्षात येत नाही. देवगावफाटा नजीकच पालघर जिल्ह्याची सीमारेषा असल्याने येथून येणाऱ्या वाहनांची मार्गक्र मण करताना पंचाईत होते. संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन त्रिफुलीची डागडुजी करून समस्या सोडवावी अशी मागणी प्रवाशी व ग्रामस्थांनी केली आहे.-----------------------------------------रस्त्याचे नुतनीकरण केव्हा?सातुर्ली फाटा ते देवगाव रस्त्याचे काम मंजूर असूनही फक्त सातुर्ली फाटा ते धारगावपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. परंतु धारगाव ते देवगाव रस्त्याचे नूतनीकरण केव्हा होणार असा सवाल नागरिक करत आहेत. ऐन पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. वावीहर्ष ते देवगाव रस्त्यात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.गेल्या एक ते दीड वर्षापासून त्रिफुलीवरील दिशादर्शक बाण, गावांची नावे व किलोमीटरचा रंग निघून गेल्याने प्रवाशांना कोणते गाव कुठल्या मार्गावर आहे आणि त्याचे अंतर किती, हे लक्षात येत नाही. परिणामी चुकामुक होत आहे.