मोकाट श्वानांचा सुळसुळाट
नाशिक : आगर टाकळी रोडवर काही चौकांमध्ये मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला असून, ते रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभे राहतात. ये-जा करणाऱ्या वाहनांच्या मागे धावतात. यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. दुचाकी स्लीप होण्याच्या घटना यामुळे घडल्या आहेत. महापालिकेने या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पोलीस गस्तीमुळे मद्यपींमध्ये दहशत
नाशिक : उपनगर परिसरातील मोकळ्या मैदानांच्या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविल्याने याठिकाणी जमणाऱ्या मद्यपींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. सायंकाळी अनेक मद्यपींचा मोकळ्या मैदानांवर गोंधळ सुरू होत असल्याने या ठिकाणाहून जाणे-येणे कठीण झाले होते.
पर्यटकांची गर्दी वाढल्याने दिलासा
नाशिक : शहर परिसरातील निसर्गरम्य परिसरात निसर्गप्रेमी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. मागील आठ महिन्यांपासून पर्यटकांची संख्या रोडावली होती. कोरोणामुळे या भागाकडे सहसा कुणी फिरकत नव्हते. यामुळे येथील व्यावसायिक अडचणीत आले होते. आता त्यांना रोजगार मिळू लागला आहे.
नवख्या नागरिकांची लूट होत असल्याची तक्रार
नाशिक : काही भागांतील सुलभ शौचालयचालकांकडून शहरात नव्याने येणाऱ्या नागरिकांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. महापालिकेने अशा भागातील चालकांना समज द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नवख्या नागरिकांकडून जादा पैसे आकारले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.