मालेगाव : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच कसमादे परिसरातील नियमित भरणारे आठवडे बाजार पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी मालेगाव आठवडे बाजार व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कैलास पगारे, सचिव बापू पाटील, प्रवीण निकुंभ यांच्यासह सर्व व्यापारी यांनी नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांना निवेदन सादर केले. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे शासनाच्या वतीने सर्व आठवडे बाजार बंद करण्यात आले होते. त्यामुळे सर्व व्यापार ठप्प होऊन व्यापारी बेरोजगार झाला. त्यामुळे कौटुंबिक प्रपंच चालवणे जिकरीचे झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे देणे, बँकेचे हप्ते, मुलांचा शैक्षणिक खर्च कशा प्रकारे करावा, हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु त्यानंतर लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे बाजार पूर्ववत सुरू होऊन गाडी रुळावर येत आहे, असे वाटत होते. परंतु कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात होऊन जिल्हाधिकारी यांनी आठवडे बाजार बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. व्यापारी बेरोजगार होत आहेत. आठवडे बाजार पूर्ववत सुरू करण्यास परवानगी मिळावी. शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करू, अशी हमी व्यापारी देतील, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहर, ग्रामीण व कसमादे भागातील व्यापारी आबा बाविस्कर, संजय सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, नानाजी चंदन, गणेश संचेती, नंदू पाटील, बापू क्षीरसागर, दिनेश पाटोळे, उमेश बागुल, बाळू जाधव, उमेश पगारे, नाना सूर्यवंशी, भूषण कर्णावत आदी उपस्थित होते.
आठवडे बाजार पुर्ववत सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:15 AM