मालेगाव : इस्लाम समाज हुंडा देण्यास व घेण्यास मान्यता देत नाही. हुंड्यासाठी विवाहित मुलींचा हाेणारा छळ समाजासाठी अशोभनीय आहे. हुंड्याची वाईट परंपरा संपविण्यासाठी मुलींना लग्नात हुंडा देण्याऐवजी त्यांना वडिलांच्या मालमत्तेत हक्क द्या, असे आवाहन कुल जमाती तंजिमचे प्रमुख माैलाना अब्दुल हमीद अझहरी यांनी केले. शहरातील गाेल्डनगर भागात जमियत अहेले हदीस कार्यालयात बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या बैठकीत माैलाना अझहरी बाेलत हाेते. गुजरात राज्यातील आयशाच्या मृत्यूमुळे समाजात हळहळ व्यक्त हाेत आहे. अशा प्रकारे समाजाच्या मुलींचा बळी जाणे दुर्दैवी असल्याचे नमूद करत अझहरी यांनी हुंडा प्रथेला विराेध केला. समाजात याविषयी जनजागृती हाेणे गरजेचे आहे. या कामात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. शहरात तरुण वर्ग नशेच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. अमली पदार्थ अगदी सहजपणे उपलब्ध हाेत आहेत. पाेलीस प्रशासनाने अवैधधंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही अझहरी यांनी केली. शहरातील जनतेला भेडसावणाऱ्या अडचणी साेडविण्यासाठी लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची भेट घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला शकील फैजी, युसूफ इलियास, फिराेज आझमी, अतहर हुसैन अश्रफी, डाॅ. अखलाख, आसिफ बाेहरा, आरीफ हुसैन आदी उपस्थित हाेते.
मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हक्क देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:17 AM