नाशिक : राज्यातील मराठा संघटना व मराठा समाजाची भूमिका जाणून घेण्यासाठी माजी मंत्री तथा भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे सध्यानाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असुन त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी संभाजी ब्रिगेडचे नाशिक महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, नितीन डागे पाटील, विक्रम गायधनी, विशाल अहिरराव, महेश निरगुडे यांनी त्यांची भेट घेऊन समाजातील विविध प्रश्नांसह मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याच्या मागण्यांचे निवेदन दिले.
सर्वोच्च न्यायालायाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर समाजातील विविध संघटांकडून आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी बैठका सुरु असताना आता राधाकृष्ण विखे पाटील यांनीही समाजाच्या विविध संघटनांसोबत चर्चा करून नेत्यांशी भेटी गाठींचे सत्र सुरू केले आहे. राधाकृष्ण विखे-पाटील हे सोमवारपासून नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी भाजपतर्फे सोमवारी (दि.७) मराठा आरक्षणासंदर्भात पक्षातील नेत्यांची बैठक घेत मराठा आरक्षणासंदर्भात भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा केली होती. यावेळी त्यांनी समाजाच्या सर्व संघटनांना एकत्रित येऊन लढा देण्याचे आवाहन करतानाच . मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे, विनायक मेटे यांनाही एकत्र आणण्याचे प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले होते. समाजाची सगळी ताकद एकत्रित आणू शकलो तर ते गरजेच असल्याचे नमूद करीत त्यांनी सरकारमध्ये विसंवाद असून आरक्षणासंदर्भात समाजाला सांगण्यासाठी सरकारकडे कोणतेही मुद्देच नाहीत, त्यामुळेच आंदोलनाची भूमिका घेण्याची वेळ आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.