ब्राह्मणगाव : येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त सरपंच सरला अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेत गावात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन अहिरे यांच्या हस्ते, तर माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे ज्ञानदेव अहिरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर कृषी अधिकारी जाधव यांनी जलसंधारण, वनविभाग व कृषी खात्याकडून करण्यात येणारी कामे, गाळ काढणे, बंधारा दुरुस्ती व अन्य एकूण ५४ लाख रुपयांच्या कामांची माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तबले यांनी राजे यशवंतराव होळकर मेंढपाळ योजनेची माहिती दिली, तर ब्राह्मणगाव बृहत संस्थेचे सचिव विष्णू जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थींच्या यादीचे चावडीवाचन केले. त्यानंतर ग्रामपंचायत थकबाकी, गावात सीसीटीव्ही बसविणे, जलशुद्धिकरण योजना आदी विकासकामांवर अहिरे यांनी माहिती दिली. सभेस कैलास अहिरे, अरुण अहिरे, नरेंद्र मालपाणी, अशोक खरे, दत्तात्रेय खरे, सुभाष अहिरे, किरण अहिरे उपस्थित होते.