मालेगावसह परिसरात उन्हाचा प्रचंड कडाका जाणवू लागला आहे. लोक उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी सावलीचा आधार शोधत असतात, परंतु मोसमपूल भागात दुपारी भरउन्हात नागरिकांना सिग्नलवर उन्हाच्या कडाक्यात उभे राहावे लागत आहे. त्यात अनेक वृद्धांना उन्हाची झळ बसत आहे. कारण सिग्नल पडल्यानंतर नागरिकांना दीड ते दोन मिनिटे सिग्नलवर ताटकळत उभे राहावे लागत आहे. उन्हाच्या झळांमुळे चक्कर येऊन पडण्याचे प्रमाणही वाढत आहे.
कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून मनपा प्रशासनातर्फे गर्दीवर नियंत्रण आणले जात आहे. मंगल कार्यालये आणि बाजारपेठांमध्येही नागरिकांना गर्दी होऊ नये, म्हणून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, मोसमपूल भागात सिग्नल पडल्यानंतर वाहनांची मोठी रांग लागते. त्यामुळे या भागात प्रचंड गर्दी होते. यावेळी अनेकांच्या तोंडावर मास्क नसतो. परिणामी, नागरिकांना शिस्त लावतानाच काेरोनाचा प्रसार तर होत नाही ना, याचाही विचार करण्याची गरज आहे. उन्हाची वाढती तीव्रता आणि काेरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता, किमान जूनपर्यंत मोसमपूल भागातील सिग्नल बंद ठेवावेत, अशी मागणी होत आहे.
ऊन वाढत असल्याने सिग्नल जवळ वाहतूक पोलीस इतका वेळ उभा राहणे शक्य होत नाही. त्यामुळे पोलीस नसल्याची संधी साधून नागरिक आणखी गर्दी करीत आहेत. याचाच परिणाम म्हणून काही वेळा रिक्षा चालकांतही वाद होऊन हाणामारीचे प्रकार घडले आहेत. मोसम पुलावर दोन्ही बाजूस एकतर रिक्षा उभ्या असतात. त्यात सिग्नल बंद असल्याने, उन्हात शेजारी वाहन चालकांना उभे राहावे लागत असल्याने, फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे.