--------------------
अश्विनाथ बाबा चौकाचे सुशोभीकरण
सिन्नर : देशमुखनगर येथील अश्विनाथ बाबा चौक ओपन स्पेस सुशोभीकरणाचा शुभारंभ माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला.
-----------------------
सिन्नर शहरात श्वानांचा उच्छाद
सिन्नर : शहरातील अनेक भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे भटके कुत्रे टोळक्याने बसत असल्याने रात्रीच्या वेळेस हे कुत्रे दिसून येत नसल्याने हल्ला चढवत आहेत. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहे.
--------------------
मास्क वापरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष
सिन्नर : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मास्कच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. अजूनही कोरोनासदृश स्थिती असतानाही नागरिक विनामास्क बिनधास्त वागत आहेत. नागरिकांनी सक्तीने मास्कचा वापर करावा व दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-----------------------
'ब्रेक द चेन'मुळे सिन्नरला शुकशुकाट
सिन्नर : 'ब्रेक द चेन' यामुळे सिन्नर शहरात दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट पाहायला मिळाला. अत्यावश्यक सेवावगळता इतर दुकाने बंद होती. ३० एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
--------------------
नांदूरशिंगोटे परिसरात शुकशुकाट
नांदूरशिंगोटे : कोरोनाचे सावट आणि त्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने नांदूरशिंगोटे परिसरात बुधवारी रस्त्यावर शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवावगळता गावातील सर्व बाजारपेठ बंद होती. विनामास्क फिरणा-या नागरिकांवर पोलिसांच्या वतीने कारवाई केली जात आहे. तसेच अनेकांना कोरोनाचे नियम सांगून समज देण्यात आली.