नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ते अतिशय खराब झाल्यामुळे या रस्त्यांवरून प्रवास करणे जिकिरीचे होत आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे तर काही रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे आदिवासी भागातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी सह्याद्री आदिवासी ठाकर समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिन्नर तालुक्यातील आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वाड्यावस्त्यांवर विखुरलेला आहे. त्यामुळे वाड्यावस्त्यांवर काही ठिकाणी अद्यापपर्यंत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. तालुक्यातील सर्वच वाड्यावस्त्यांवर ५०० ते ६०० लोकसंख्या आहे; पंरतु या भागात दळणवळणासाठी रस्ते चांगल्या स्थितीत नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, तर काही ठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून पडली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भोजापूर खोऱ्यातील सोनेवाडी येथील मेंगाळवाडी या वस्तीवरील भैरवनाथ मंदिर या देवस्थानाला सभा मंडप व पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर करण्यासाठीही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सह्याद्री आदिवासी ठाकर समाज उन्नती मंडळाचे तालुकाध्यक्ष अजय कडाळे, राज्य सदस्य कचरू मेंगाळ, जिल्हा सदस्य सोमनाथ मेंगाळ, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मेंगाळ, प्रल्हाद उघडे, पांडुरंग मेंगाळ, राजू पथवे, आबाजी आगीवाले, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन जाधव आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील बहुतांश आदिवासी भागातील विविध विकास कामे मार्गी लागली असून, ज्या भागातील रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे तेथील कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार कोकाटे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
------------------------------
लहान रस्त्यांमुळे अपघात
ठराविक भाग वगळता सर्वत्र खडीचे रस्ते असल्याने नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत असतात, तसेच शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग, शेतकरी व आदिवासी बांधव यांना रस्त्यावरून चालणे जिकिरीचे होते, तसेच आदिवासी बांधव व परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील भाजीपाला मार्केटला नेणे अतिशय कठीण होत आहे. वाड्यावस्त्यांवर दळणवळणासाठी एकच रस्ता असल्याने मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे आदिवासी भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी आमदार कोकाटे यांच्याकडे केली आहे.
-------------------------
आमदार माणिकराव कोकाटे यांना निवेदन देताना सह्याद्री आदिवासी ठाकर समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी. (०६ नांदूरशिंगोटे १)
060721\06nsk_4_06072021_13.jpg
०६ नांदुरशिंगोटे १