नाशिक : राज्याचे ग्रामविकास विभाग मंत्रालयाचे प्रधान सचिव व्ही़ गिरीराज यांना निवेदन देत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी जिल्ह्यातील विकासकामांच्या समस्या मांडून त्यासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी केली़ नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात आज झालेल्या पेसाच्या कार्यशाळेसाठी व्ही. गिरिराज आले होते़ यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी भेट घेत ग्रामविकासाच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या़ दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने प्रत्येक पंचायतीच्या मुख्यालयाजवळ गुदामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, जिल्ह्यातील अनेक तीर्थक्षेत्रे आदिवासी क्षेत्रात असल्याने आदिवासी विकास विभागाकडून अ व ब दर्जा असणाऱ्या तीर्थक्षेत्रांना अनुदान उपलब्ध करून द्यावे, आदिवासी भागांच्या विकासासाठी आदिवासी विभागात नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यात यावा, दिंडोरी पंचायत समिती इमारतीसाठी वाढीव अनुदान मिळावे, ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रमाअंतर्गत अनुदान मिळावे, जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी आस्थापनाविषयक अधिकार जिल्हा परिषदेस प्रदान करण्यात यावी आदि मागण्या करण्यात आल्या़
विशेष तरतूद करण्याची मागणी
By admin | Published: December 03, 2014 2:01 AM