----------------------------------
शिर्डी रस्ता झाला धोक्याचा
सिन्नर : सिन्नर - शिर्डी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, अनेक ठिकाणी बाह्य वळणे व रस्त्याच्या कामामुळे सदर रस्ता धोकादायक झाला आहे. काही ठिकाणची कामे प्रगतीपथावर असल्याचे फलक असले तरी रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी वाहनचालकांची फसगत होत आहे. काही ठिकाणे अपघातप्रवणक्षेत्र बनली आहेत. त्यामुळे वाहनांचा अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने अपघात होणार नाही, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
------------------------------------
शेतीची वीजतोडणी थांबविण्याची मागणी
सिन्नर : शेतीची वीजबिले थकवणाऱ्या शेतकऱ्यांची वीज खंडित करण्याची मोहीम महावितरण कंपनीने सुरु केली आहे. सदर मोहीम थांबविण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आला आहे. त्यात हातातोंडाशी आलेला घास वीज खंडित करण्याच्या प्रकारामुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करु नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
----------------------------------
वस्तीवरून दुचाकीची चोरी
सिन्नर : निमगाव - देवपूर ते खडांगळी रस्त्यावर वस्तीवर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. मच्छिंद्र बहिरु कोकाटे यांच्या वस्तीवर घराबाहेर बजाज प्लॅटिना दुचाकी (क्रमांक एमएच १५ एचजे २२७३) लावली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुचाकी चोरुन नेली. सकाळी सदर घटना उघडकीस आली. याप्रकरणी विजय खंडू कोकाटे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार गोरक्षनाथ बलक अधिक तपास करीत आहेत.
-----------------------------
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
सिन्नर : तालुक्यातील पाटपिंप्री येथील सागर भास्कर उगले (२६) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. उगले यांची देशवंडी शिवारात पोल्ट्री आहे. या पोल्ट्रीच्या लोखंडी अॅँगलला दोर टांगून आत्महत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव गायकवाड अधिक तपास करीत आहेत.