देवगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचाराची साधने कमी पडु लागत असल्याने अनेक रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावागावातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच जिल्हा रुग्णांलय नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव येथे असलेले कोविड सेंटरही अपूरे पडत असून त्यावरही अतिरिक्त रूग्णसंख्येचा भार पडत आहे. त्यामुळे लासलगाव या ठिकाणी मोठे आॅक्सिजन उपलब्ध असणारे कोविड सेंटर सुरु करावे, अशी मागणी देवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल बोचरे यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.सद्यपरिस्थितीत निफाडसह तालुक्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून रूग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. परिसरातील अनेक कुटुंबांतील पुरूषांना जीव गमवावा लागल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. निफाड शहरापाठोपाठ लासलगाव परिसरातील गावांत या विषाणुंचा जास्त प्रभाव जाणवत असून खासगी रूग्णालयात जावुन उपचार करणे ग्रामीण भागातिल सवर्सामान्यांना परवडणारे नसल्याने पिपंळगाव बसवंत ,लासलगाव येथे सूरू असलेले कोविड सेंटर अपुरे पडत आहे. लासलगाव हे गाव मध्यवर्ती ठिकाण असून दळणवळणाच्या दृष्टीने व आवश्यक त्या सुविधा तत्काळ उपलब्ध असल्याने परिसरातिल वीस ते पंचवीस गावांतील रुग्णांना याचा निश्चितच लाभ घेता येईल. त्यामुळे गंभीर परिस्थितीतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी लासलगाव येथे मोठे स्वरुपाचे आॅक्सिजन उपलब्ध असणारे कोविड सेंटर उभारल्यास या परिसरातील जनतेची गैरसोय टळणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे .