मेहेर सिग्नल-सीबीएस दरम्यान वाहतूक कोंडी
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यलय प्रवेशद्वार सुशोभीकरणाचे काम सुरू असल्यामुळे स्मार्ट रोडवर सीबीएस ते मेहेर सिग्नलदरम्यान वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रवेशद्वाराचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
वाढत्या उन्हामुळे भाज्यांची आवक मंदावली
नाशिक : वाढत्या उन्हामुळे येथील बाजार समितीत पालेभाज्यांच्या आवकेवर परिणाम झाला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांच्या दरात थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असले तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र आर्थिक भुुर्दंड सहन करावा लागत आहे.
दरवाढीमुळे सामान्य अडचणीत
नाशिक : डिझेलचे दर वाढल्याने वाहतूकदारांनी दरवाढ केल्याने अनेक वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक संकट असल्यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ढगाळ वातावणामुळे शेतकरी चिंतित
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या वातावरणाचा उन्हाळ कांद्याच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना औषधांची फवारणी करावी लागत असून उत्पादन खर्च वाढला आहे.
अनेकांचा रिचार्जचा खर्च वाढला
नाशिक : कोरोनामुळे अनेक नागरिक बहुसंख्य काम ऑनलाईन करत असल्यामुळे अनेकांचा मोबाईल रिचार्जचा खर्च वाढला आहे. विद्यार्थ्यांचे क्लासही ऑनलाईन सुरू असल्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
वाळवणाचे पतार्थ तयार करण्यास अडचणी
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने महिलांना वाळवणाचे पदार्थ तयार करण्यात अडचणी येत आहेत. उन्हाळ्यात महिलांची वाळवणाचे पदार्थ करण्याची लगबग सुरू असते.
गोदाघाट परिसरात नियमांचे उल्लांघन
नाशिक : गोदाघात परिसरात कपडे धुण्यास मनाई असली तरी अनेक नागरिक सर्रासपणे या परिसरात कपडे धुताना दिसतात. काही वाहनचालक याच ठिकाणी वाहने धुतात. यामुळे पाणी प्रदर्शनात वाढ होत असून या नागरिकांना कपडे व वाहने धुण्यास मनाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.