लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावांत भरणारे आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. परिणामी व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार भरवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आठवडे बाजार व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.व्यापाºयांनी व्यवसायासाठी बॅँका, पतसंस्था व हात उसनवार करून माल भरला आहे. मात्र माल विक्री होत नसल्याने रकमेची परतफेड कशी करायची, अशी चिंता व्यापारीवर्गाला लागली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आठवडे बाजार बंद आहेत. मात्र बॅँकांचे व्याज सुरू आहे. शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. शासनाच्या नियमानुसार आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष कैलास पगारे, बापू पाटील, नंदकिशोर पाटील, उपाध्यक्ष हिरालाल शिरसाठ, संजय सोनवणे, अनिस अहमद हबीब अहमद, नंदकिशोर बाविस्कर, प्रवीण निकुंभ, रमेश पगारे, प्रताप पाटील, शरद बिरारी, चंद्रकांत सोनवणे, आनंद पिंगळे, संतोष माळी, अशोक अहिरे आदींसह पदाधिकाºयांनी केली आहे.
गावागावांतील आठवडे बाजारात व्यापारी तात्पुरते दुकान उभारून वेगवेगळ्या मालाची विक्री करीत असतात. ग्रामीण भागातील नागरिकांना या बाजारातून वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. यामुळे व्यावसायिकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. ग्रामस्थ व मजूरवर्गाला खरेदीसाठी आठवडे बाजार सोईचा असतो. मात्र गेल्या पाच-सहा महिन्यांपासून आठवडे बाजार बंद आहेत.