सिडको : जुने सिडको येथील मैदानाची दुरवस्था झाली असून, येथे कचरा आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच येथे अंधार असल्याने अनेक मद्यपींनी मैदानाला दारूचा अड्डा बनविले आहे. त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला व लहान मुलांची मोठी गैरसोय होत असल्याने या ठिकाणी विकासात्मक सोयीसुविधा उपलब्ध करून ग्रीन जिम उभारण्यात यावी, या मागणीसाठी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. लोकमान्य वाचनालयात आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नागरिक समितीतर्फे ही माहिती देण्यात आली. महापालिकेने मैदान स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विकासात्मक उपाययोजना कराव्यात यासाठी महापालिका आयुक्तांना १७ डिसेंबर २०१५ रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर प्रातिनिधिक स्वरूपात ३६० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन दिल्यानंतर पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. २६ जानेवारीपर्यंत प्रतिसाद म्हणून मैदान सुधारण्यास सुरुवात करण्याची मागणीही या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दरम्यान, मैदान स्वच्छ करून त्याचा सार्वजनिक कामासाठी उपयोग व्हावा, यासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी कंबर कसली आहे. मैदानाच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक मैदानात येत असतात. (वार्ताहर)
ग्रीन जिम सुरू करण्याची मागणी
By admin | Published: January 17, 2016 10:52 PM