महानगर पालिकेकडून सध्या शहरात ठिकठिकाणी सर्व घरांच्या बांधकामाची नव्याने मोजणी केली जात असून त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपासून शहरात घरपट्टीसाठी नव्याने मोजणी करण्यासाठी काही अधिकारी फिरत आहेत. त्यामुळे नागरिक संभ्रमात पडले असून, ती मोजणी नक्की कशासाठी होत आहे. महानगर पालिकेने याचा अधिकृत खुलासा करावा तसेच मोजणीचा ठेका, हा त्रयस्थ कंपनीला दिला असून, त्यासाठी मोठा खर्च होत आहे. कोरोनासारख्या महामारीच्या वेळेत हा अतिरिक्त खर्च आताच का करावा, असा प्रश्न सुरेश निकम यांनी यावेळी उपस्थित केला. या अनुषंगाने महानगरपालिका नागरिकांवर घरपट्टी वाढीव दराने आकारणार असल्याचा संशय आहे. हा खर्च थांबवावा तसेच कोरोनामुळे प्रत्येक नागरिक आधीच आर्थिक संकटात सापडला असून, त्यावर अतिरिक्त भर टाकू नये, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, हरिप्रसाद गुप्ता, नगरसेवक संजय काळे, देवा पाटील, प्रकाश मुळे, योगेश पाथरे, हेमंत पूरकर, श्याम गांगुर्डे, सलीम पिंजरी, शेख इब्राहिम, राहुल आघारकर, पप्पू पाटील, पंकज दुसाने, संदीप जाधव, सचिन कैचे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.