वाहेगावसाळ : येथील ग्रामपंचायत हद्दीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याने वादविवाद, भांडणतंटे वाढले असून महिलावर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे. अनेक तरुण या व्यसनाकडे वळल्याने अनेकांचे संसार उदध्वस्त तसेच उघड्यावर पडले आहे. यामुळे ग्रामस्थांनी अवैधरित्या दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायतीने तसा ठराव करून चांदवड पोलीस स्टेशन यांना दिला आहे.गेल्या काही महिन्यापासूनच ही अवैध दारू विक्री चालू होती. अनेकवेळा वृत्तपत्रात देखील वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलीस प्रशासन मात्र, तुटपुंजी कारवाई करून हात काढून घेत होते. पोलीस प्रशासनच यांना पाठिंबा घालीत आहे, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.मात्र वाढत जाणाऱ्या दारू विक्री तसेच दररोजच्या जाचाला कंटाळत महिलांनी व पुरुषांनी तसेच अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे सदस्य यांनी ग्रामपंचायतीवर हल्लाबोल केला. ग्रामपंचायतीने तातडीने मासिक सभा घेऊन ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अवैध दारु दुकाने कायमस्वरूपी बंद व्हावीत असा ठराव संमत करीत याबाबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, चांदवड पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, विभागीय दंडाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, या ठिकाणी निवेदन देण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी सरपंच केशव खैरे, उपसरपंच सीमा न्याहारकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे सर्व सदस्य तसेच गावातील भगवान मंडलिक, आप्पा रसाळ, अंकुश खुरसने, प्रवीण रसाळ, आण्णा सोनवणे, अश्विनी खैरे, रेखा पवार, हिराबाई भोरकडे, अर्चना मंडलिक, लता खैरे, मेघा मंडलिक व अन्य गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासन स्तरावरून अवैध दारू विक्री कायमस्वरूपीची बंद न झाल्यास गावातील सर्व महिला व पुरुष मंडळी हे चांदवड पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय चांदवड येथे आंदोलन करीत आमरण उपोषण करणार आहेत, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 10:39 PM
वाहेगावसाळ : येथील ग्रामपंचायत हद्दीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याने वादविवाद, भांडणतंटे वाढले असून महिलावर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे. अनेक तरुण या व्यसनाकडे वळल्याने अनेकांचे संसार उदध्वस्त तसेच उघड्यावर पडले आहे. यामुळे ग्रामस्थांनी अवैधरित्या दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायतीने तसा ठराव करून चांदवड पोलीस स्टेशन यांना दिला आहे.
ठळक मुद्देवाहेगावसाळ मधील महिला आक्रमक : ग्रामपंचायतीच्या सभेत ठराव मंजूर