नाशिक : इंटरनेटसेवेसाठी चांगले रस्ते खोदण्याच्या प्रकाराबद्दल शिवसेना आक्रमक झाली असून, चांगले रस्ते फोडणे तातडीने थांबवावे, अशी मागण आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेने यापूर्वी अनेकदा अशाप्रकारच्या परवानग्या दिल्या, परंतु रस्ते फोडल्यानंतर ते पुन्हा जैसे थे करून दिले जात नसल्याने हे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.महापालिकेने शासनाच्या धोरणानुसार इंटरनेट सेवेसाठी भूमिगत केबल टाकण्याचे धोरण मंजूर केले आहे. परंतु त्यानंतर महापालिकेने शहरातील तीन ते पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले चांगले रस्ते फोडण्यास परवानगी दिली जात आहेत. जेहान सर्कल ते पाइपलाइनरोड परिसरात अशाच प्रकारे रस्ते फोडले जात असून, एकाच कंपनीने परवानगी घेऊन अन्य कंपन्यांच्या केबल घुसवण्याचा प्रकार सुरू आहे. महापालिकेच्या या फसवणुकीबाबत लोकमतने वृत्त दिले होते. त्यानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि गटनेता विलास शिंदे यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले आहे. महापालिकेने यापूर्वीदेखील रस्ता फोडण्याच्या कामाचे शुल्क (डॅमेज चार्जेस) घेऊन कामे करण्यास परवानगी दिली आहे. परंतु काम झाल्यानंतर संबंधित कंपनी किंवा महापालिकेच्या वतीने रस्ते दुरुस्त केले जात नाहीत. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा खालावला गेला आहे. तसेच रस्त्याचा खर्चदेखील वाया गेला आहे. ही बाब गंभीर असून नागरिकांचा कराचा पैसा वाया जात आहे. त्यामुळे यापुढे अशाप्रकारचे काम करायचे असेल तर कामास सुरुवात करण्यापूर्वीच संबंधित कंपन्यांना अथवा सरकारी उपक्रमांना कळवून रस्ते खोदकाम करून घ्यावे त्यांनतर रस्ता फोडू नये, त्याचप्रमाणे महापालिकेने रस्त्याच्या खाली स्वत: पाइप टाकून अशाप्रकारच्या सर्व्हीस केबल टाकण्याची सोय करून द्यावी तोपर्यंत रस्ते फोडू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
रस्त्यांची खोदकामे थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 1:05 AM