कळवण : कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. अटी शिथिल झाल्यानंतर दुकानदारांकडून नियमांचे पालन होत असताना कळवण शहरातील व्यापारी, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना, आदिवासी व सर्वसामान्य जनतेला नियम व कारवाईचा धाक दाखवत कारवाई टाळण्यासाठी व गुन्हे दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नीळकंठ सोनवणे यांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप दुकानदार व व्यावसायिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर येथील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांची भेट घेऊन सोनवणे यांची चौकशी करून निलंबित करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार, बाजार समिती सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेना शहरप्रमुख साहेबराव पगार, संभाजी पवार, मनसे तालुकाध्यक्ष शशी पाटील, वंचित आघाडी तालुकाध्यक्ष प्रदीप निकम, नगराध्यक्ष रोहिणी महाले, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष उपनगराध्यक्ष अतुल पगार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जितेंद्र पगार, मानवाधिकार संघटना तालुकाध्यक्ष कृष्णा जगताप, व्यापारी महासंघाचे जयंत देवघरे, दीपक महाजन, उमेश सोनवणे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.मनमानी व भ्रष्ट कारभार करणाºया सोनवणेंमुळे पोलीस खात्याची बदनामी होत आहे. यामुळे त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.
नीळकंठ सोनवणे व्यापाऱ्यांना वेठीस धरतात. निष्पाप नागरिकांवर गुन्हे दाखल करीत असून, गुन्हे दाखल न करण्यासाठी व्यावसायिकांकडून पैशाची मागणी करीत असल्याच्या तक्र ारींचा पाढा शिष्टमंडळातील पदाधिकारी यांनी पोलीस उपअधीक्षक वाघमारे यांच्यासमोर वाचला.