पेठ : तालुक्यात सध्या खरीप पेरणीची लगबग सुरू असल्याने शेतकरी बी-बियाणे व रासायनिक खते खरेदीसाठी बाजारात गर्दी करत असून, आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी कृषी सेवा केंद्राच्या दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात यावे, अशी मागणी पेठ तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगार यांना दिलेल्या निवेदनात शासनाने लॉकडाऊनमध्ये सवलत दिल्याने शेतोपयोगी साहित्य खरेदीसाठी शेतकरी पेठ, करंजाळी, कोहोर, जोगमोडी येथे दाखल होत आहेत. कोरोना व टाळेबंदी यामुळे कृत्रिम टंचाई भासवून आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता गृहीत धरून प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या दर्शनी भागात शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल जाधव, उपाध्यक्ष विलास जाधव, हेमराज गावंडे आदींच्या स्वाक्षºया आहेत. निवेदनाच्या प्रती कृषिमंत्री, जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार आदींना देण्यात आल्या आहेत.
कृषी सेवा केंद्राच्या दर्शनी भागात दरपत्रक लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 6:44 PM