सटाणा : बागलाण तालुक्यात असलेल्या धनगर समाजाची एकूण लोकसंख्या संपूर्ण तपशिलासह तत्काळ द्यावी आणि धनगर समाजाला विनाविलंब आरक्षण मिळावे, अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा बागलाण तालुका धनगर समाज कृती समितीतर्फे सोमवारी (दि. ६) निवेदनाद्वारे देण्यात आला. सोमवारी सकाळी ११ वाजता धनगर समाज बांधवानी तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजीस सुरु वात केली. धनगर समाज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बागलाणचे नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात, निवडणुकीपूर्वी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाचा निर्णय निकाली काढण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र चार वर्ष उलटूनही धनगरांचा आरक्षणाचा विषय बाजूला पडला आहे, असे निवेदनात म्हटले आहे़यावेळी कृती समितीचे दिनकर पाकळे, विनोद नंदाळे, आदेश नंदाळे, रूपेश शिरोळे, आप्पा यशवंत नंदाळे, आप्पा नंदाळे, मधुकर मोरे, मधुकर नंदाळे, वैभव नंदाळे, आदींसह धनगर समाज बांधव उपस्थित होते. बागलाण तालुक्यातील धनगर समाजाची लोकसंख्या किती आहे आणि तालुक्यातील कोणकोणत्या गावात धनगर समाजाचे लोक राहतात, त्यांच्या पत्त्यासह सर्व माहिती शनिवारपर्यंत (दि.११) लेखी स्वरूपात मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याप्रमाणे माहिती न मिळाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
धनगर समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:57 AM