खामखेडा : सटाणा येथील गॅस एजन्सीने घरपोहच सिलिंडर देण्यास सुरुवात केली आहे; परंतु या गाडीची वेळ निश्चित नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असल्याने वेळ निश्चित करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील सिलिंडरधारकांकडून करण्यात येत आहे.सटाणा येथील सटाणा गॅस व गोदावरी गॅस एजन्सी यांनी सिलिंडर घरपोहच सेवा सुरू केली आहे. त्याचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. सटाणा गॅस एजन्सी दर बुधवारी व शनिवारी व गोदावरी गॅस एजन्सी आठवड्यातून एकदा शनिवारी वाहनाद्वारे खामखेडा येथे ग्राहकांना सिलिंडर वितरित करते; परंतु सिलिंडरची ही गाडी कधी एक वाजता, तर कधी सायंकाळी पाच-सहा वाजता येते. सिलिंडर घेण्यासाठी पिळकोस, भादवण, विसापूर आदि गावांतील नागरिकांना यावे लागते. गाडीची वेळ निश्चित नसल्यामुळे काही सिलिंडरधारकांना सकाळपासून सायंकाळपर्यंत गाडीची वाट पाहावी लागते. जर लवकर गाडी येऊन गेली तर काहींना रिकामे सिलिंडर घेऊन घरी परत जावे लागते. तेव्हा या गाडीची वेळ निश्चित करण्यात येऊन सिलिंडरधारकांची गैरसोय टाळण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
सिलिंडर गाडीची वेळ निश्चित करण्याची मागणी
By admin | Published: November 26, 2015 11:44 PM