नाशिक : महापालिकेला जकातीच्या तुलनेत एलबीटीची रक्कम न मिळाल्याने राज्य शासनाने कबूल केल्याप्रमाणे तफावतीपोटी असलेली सुमारे दीडशे कोटी रुपयांची रक्कम अदा करावी, अशी मागणी महापालिकेने केली आहे. सिंहस्थ कामांच्या तोंडावर हा निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे. गेल्या वर्षी जकात रद्द करून एलबीटी लागू करताना राज्य शासनाने यासंदर्भात जाहीर केले होते. जकात रद्द झाल्यास त्यापोटी पालिकेचे होणारे नुकसान पहिल्या वर्षी राज्य शासनच देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. नाशिक महापालिका हद्दीत एलबीटी लागू झाल्यानंतर गेल्या वर्षी जकात वसुलीचे मिळालेले उत्पन्न विचारात घेऊन महापालिकेने साडेआठशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते; परंतु प्रत्यक्षात जेमतेम साडेसहाशे कोटी रुपयेच वसूल झाले. एलबीटीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने महापालिकेची अडचण होत असून, विकासकामे तसेच कुंभमेळ्याच्या कामांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने जकात आणि एलबीटी यांच्यातील तफावत असलेली रक्कम त्वरित अदा करावी, अशी मागणी उपमहापौर कुलकर्णी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
थकीत रकमेसाठी पालिकेची मागणी
By admin | Published: May 20, 2014 12:59 AM