पंचवटी : आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र शासन तसेच पोलीस प्रशासनाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले व महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरले म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे रविवारी पंचवटी पोलिसांना निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार राणा दाम्पत्याने मुंबईत मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याबाबत वक्तव्य करून मुंबईत धाव घेतली होती. मात्र, त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राणा दाम्पत्याने केलेल्या या कृत्याचा राज्यभरात शिवसेनेने निषेध नोंदविला होता. रविवारी रात्री शिवसेना उपनेते सुनील बागुल यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन देत मागणी केली. यावेळी महानगर संघटक योगेश बेलदार, उपमहानगरप्रमुख शैलेश सूर्यवंशी, उपमहानगर प्रमुख सुनील जाधव, सुनील निरगुडे, महेंद्र बडवे, संजय थोरवे, विभाग प्रमुख चांगदेव गुंजाळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.