--------------------------------
प्रहार जनशक्तीचे निवेदन
सिन्नर : शहरातील झोपडपट्टीवासियांची घरे त्वरित त्यांच्या नावावर करावीत, त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. नायब तहसीलदार दत्ता जाधव यांना मागण्यांचे निवेदन तालुकाध्यक्ष कैलास दातीर यांनी दिले. यावेळी मुकुंद खर्जे, राहुल इनामदार, चंद्रकांत डावरे, कपिल कोठूरकर, नागेश काथमिरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------------------------
तीन केंद्रात आरटीपीसीआर टेस्ट
सिन्नर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक वाढू लागल्याने तालुका आरोग्य विभागाने सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णाबरोबरच पांढुर्ली, वावी व ठाणगाव येथील तीन आरोग्य केंद्रात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी सुरु केली आहे. वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहे.
----------------------------
शिवसेना सदस्य नोंदणीला प्रारंभ
सिन्नर : शहर व तालुक्यातील शिवसेना सदस्य नोंदणीला येथील शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयातून प्रारंभ करण्यात आला. माजी आमदार वाजे व शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे यांनी सदस्य नोंदणी अर्ज भरुन अभियानाचा प्रारंभ केला. प्रत्येक गावात सदस्य नोंदणी करण्यात येणार असून, जास्तीत जास्त सदस्य नोंदणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, पिराजी पवार, शहरप्रमुख गौरव घरटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
------------------------------------------
दापूर आरोग्य केंद्रात लसीकरण
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारपासून कोविड प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ गावांचा समावेश होतो. पहिल्या दिवशी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजार असलेल्या व्यक्तिंना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के, डॉ. राहुल हेंबाडे, डॉ. प्रणाली दिघे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
---------------------------------------------------
सिन्नर येथून दुचाकीची चोरी
सिन्नर : येथील शेळके रुग्णालयासमोरुन चोरट्याने दुचाकी चोरुन नेल्याची घटना घडली. सुनील आनंदा कातोरे (रा. निंबाची वाडी, ता. अकोला) यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी क्रमांक (एमएच १५ बीई ६३४९) ही शेळके रुग्णालयासमोर उभी केली होती. यावेळी अज्ञाताने त्यांची दुचाकी चोरली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी अधिक तपास करत आहेत.