सुसाट धावणाऱ्या दुचाकींचा धोका
लोखंडेमळा : उपनगर-जेलरोड यांना जोडणाऱ्या लोखंडे मळा रस्त्यावर काही टवाळखोर सुसाट वेगाने वाहने चालवित असल्याने धोका वाढला आहे. या मार्गावर भाजीबाजार भरत असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. अशा गर्दीतून काही अल्पवयीन टवाळखोर दुचाकी सुसाट वेगाने चालवित असल्याने पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यांवर ठिकठिकाणी मास्क विक्री
बोधलेनगर : द्वारका ते नाशिकरोड या मार्गावर अनेक ठिकाणी मास्क विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. अनेकविध आकाराच्या मास्कमुळे ग्राहकही आकर्षित होतात. या विक्रेत्यांकडी मास्कची विक्री जोरात सुरू असल्याचे दिसते. शासनाने कमी दरात मास्क उपलब्ध असल्याचे सांगितले असले तरी २० ते १२० रुपयांपर्यंत मास्क विकले जात आहेत.
शहरात पार्कींगचे तीनतेरा
नाशिक: शहरात पार्कींगची सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच निर्माण होते. मुख्य बाजारपेठेत आणली जाणारी वाहने, एकेरी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष तसेच रस्त्यावरच उभ्या केेलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
गांधीनगर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
गांधीनगर : गांधीनगर येथील अंतर्गत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. सदर वसाहत ही गांधीनगर प्रेसची मालमत्ता असल्याने प्रेस प्रशासनाच्या अंतर्गत ही बाब आहे. मात्र, या मार्गाचा वापर कर्मचारी आणि स्थानिक रहिवासीदेखील करीत असल्याने या मार्गाची दुरुस्ती करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शिवाजीनगर येथून अवजड वाहने बंद
जेलरोड : जेलरोड येथील शिवाजीनगरकडून लोखंडे मळ्याकडे जाणाऱ्या मार्गावरून अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. अरुंद रस्ता आणि रस्त्यावरील बाजारपेठमुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
वास्को चौकातील हातगाड्यांचा अडथळा
नाशिकरोड : वास्को चौक ते शिवाजी पुतळा रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या हातगाडीवरील विक्रेत्यांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने हातगाड्यांमुळे अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. बेशिस्त रिक्षाचालकांचीही त्यामध्ये भर पडली आहे.