मालेगाव : मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील मालेगाव शहर व हद्दवाढीतील क्षेत्र विचारात घेऊन अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी मागणी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत मालेगाव शहर पाणीपुरवठा योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार अंदाजपत्रके व आराखड्यास तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे. सदर कामाच्या अंदाजपत्रकास लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. महापालिके अंतर्गत शहर व हद्दवाढीतील क्षेत्रात सद्यस्थिती अपुरा पाणीपुरवठा होतो.महापालिकेतील शहर व हद्दवाढीतील क्षेत्रात पाणीपुरवठ्यासाठी ज्या ठिकाणी जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत त्या भागात पाणीपुरवठ्यासाठी नव्याने जलवाहिनी टाकून अमृत अभियाना अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी शिवसेना गटनेते मनोहर बच्छाव, नगरसेवक तानाजी देशमुख, मजुर फेडरेशनचे नीलेश आहेर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मालेगावसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2016 11:08 PM