इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाचे काम पंतप्रधान सिंचन योजनेतून दोन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले. या धरणासाठी भावली गाव बुडीत क्षेत्रात गेले. या गावाच्या पुनर्वसनाचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांनी नियोजित ठिकाणी घरे बांधलेली नाहीत. यामुळे या धरणात पूर्ण पाणीसाठा करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी मे महिन्यातच शासनाकडे केली होती. मात्र शासनाने या मागणीची दखल न घेता पुनर्वसनाचे प्रलंबित कामे पूर्ण न करता सोमवारी या धरणाचे गेट बंद केले. दरम्यान, या बाबीची माहिती ग्रामस्थांना समजताच त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या धरणाचे गेट तत्काळ उघडावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल पुरे व घोटी पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. या शिष्टमंडळात श्रमजीवीचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे, भास्कर पाचरणे, भगवान पाचरणे, सीताराम गावंडा, संपत काळचिडे, गणपत काळचिडे, त्र्यंबक खाडे,कचरू पाचरणे, दशरथ आघान, दत्तू खाडे, वाळू सराई आदींचा समावेश होता.
भावली विस्थापितांची मागणी झुगारून धरणाचे गेट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 8:08 PM