नाशिक : द्वारका येथील महालक्ष्मी चाळीत उभारलेल्या नाशिक महापालिका सफाई कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कारभाराबाबत आलेल्या तक्रारींवरून सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांनी सदर गृहनिर्माण संस्थेची नोंदणी रद्द करण्यासंबंधी काढलेल्या आदेशाला संस्थेने आव्हान दिले असून, उपनिबंधकांचीच चौकशी करावी आणि त्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी विभागीय सहनिबंधकांकडे केली आहे. उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशाबद्दल मनपा सफाई कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष विनोद दलोड आणि सेक्रेटरी ज्योती तसांबड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, उपनिबंधकांनी जागेची समक्ष येऊन पाहणी केली असती तर शिल्लक राहिलेल्या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळू शकली असती, परंतु केवळ कागदी घोडे नाचविण्यात आले. उपनिबंधकांनी त्यांच्याकडे प्राप्त तक्रारअर्जावरील स्वाक्षऱ्या करणारे संस्थेचे सभासद आहे किंवा नाही याची शहानिशा केली नाही. केवळ संस्थेला पत्र देणे, लेखापरीक्षकांना आदेश देणे यापलीकडे काहीही केले नाही. संस्थेने संस्था स्थापनेपासून शासकीय पॅनलवरील लेखापरीक्षकांना धनादेशाद्वारे शुल्क देऊनही लेखापरीक्षणाचे काम केले नाही. मात्र, संस्थेने संपूर्ण दप्तर अद्ययावत करून प्रमाणित लेखापरीक्षकांकडून लेखापरीक्षण करून घेतले आहे. सहकार कायद्यानुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्याअगोदर संस्थेला नोटीस देणे गरजेचे होते. परंतु संस्थेला कोणतीही नोटीस मिळालेली नाही.
उपनिबंधकांच्या चौकशीची मागणी
By admin | Published: March 11, 2016 12:37 AM