त्र्यंबकेश्वर : आखाड्यांनीच भाविकांची व रथाची संख्या कमी करण्याची सूचनात्र्यंबकेश्वर : प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या असल्या, तरी काही मागण्या अजून अपूर्णच आहे. असे आखाडा परिषदकडून सांगण्यात आले. शाहीस्नानाची वेळ वाढवून मिळावी, ही मागणी शेवटच्या क्षणी केल्याने ती पूर्ण करता येणे अशक्य आहे. यावर प्रशासन ठाम आहे. असे परिेषदेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले, तर आगामी शाही मिरवणुकीत आखाड्यांनी आपल्या भाविकांची व रथांची संख्या कमी करावी, असे प्रशासनाकडून महंतांना सांगण्यात आले. येथील नूतन तहसील कार्यालयात मंगळवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, महामंत्री महंत हरीगिरी महाराज, षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत सागरानंद सरस्वती, शंकरानंद सरस्वती, उपाध्यक्ष प्रेमागिरी, उमाशंकर भारती, महंत राजिंदर सिंहजी, महंत जगतारमुनीजी, महंत त्रिवेणीदास, प्रेमानंदजी आदि संत-महंत उपस्थित होते, तर प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मेळाअधिकारी महेश पाटील, प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम, बाळासाहेब शेवाळे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, राजेंद्र कांबळे आदि अधिकारी बैठकीस उपस्थित होते. आखाडा परिषदेने प्रशासनाकडे शाहीस्नानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी शेवटच्या क्षणी केल्याने ती मान्य करता येणार नाही असे प्रशासनाने बैठकीत स्पष्ट केले. त्यातील त्रुटी, अडचणी महंतांना समजून सांगण्यात आल्या. (वार्ताहर)कुशावर्तावर मज्जाव केला जाणार नाही
शाही मिरवणुकीत आखाड्यांतर्फे आलेल्या भाविकांना-सांधूना कुशावर्तावर सोडण्यास मज्जाव केला जाणार नाही. सामान्य नागरिक व पोलिसांनाही कुशावर्तावर जाण्यास मज्जाव राहील. कुशावर्त चौकातून शाही मिरवणुकीतील साधूंना पोलीस आत सोडतील. घाटावरदेखील सक्ती केली जाणार नाही, असे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. २९ आॅगस्टच्या पर्वणीच्या वेळी कुशावर्तावर गर्दी होऊ नये, म्हणून पोलिसांनी साधंूना, भाविकांना घाटावर जबरदस्तीने स्नान करण्यास भाग पाडले तसेच साधू आणि महिलांनाही धक्काबुक्की केली. यावर साधू-महंत नाराज झाले होते.