नाशिक: नुकत्याच लागू करण्यात आलेल्या युनिफाईड डीसीपीआर संदर्भात नाशिककरांचे असलेले प्रश्न तसेच शंकांचे निरसन करण्यासाठी येत्या ११ तारखेला जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाकवि कालिदास कलामंदिर येथे सकाळी ११ वाजता या संदर्भात व्याख्यान होणार असून नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील अनेक एटीएम सुरक्षा रक्षकांविना
नाशिक: शहरातील अनेक एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांचे शहरात एटीएम आहेत. मात्र त्यांनी कपातीचे धोरण स्वीकारल्याने शहरातील अनेक एटीएममधील सुरक्षा रक्षक कमी केले आहे. जेथे बँकेची शाखा आहे अशाच ठिकाणी असलेल्या एटीमएमची सुरक्षा दिसून येते.
तारवाला-पेठरोड लिंकरोडची दुरूस्ती
नाशिक: तारवाला सिग्नल ते पेठरोडवरील आरटीओ कॉर्नर जवळील सिग्नलच्या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या भूमिगत गटारींचे ढापे देखील बदलण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावरील भूमिगत गटारींचे ढापे चोरीस गेले होते. त्यामुळे धोका निर्माण झाला होता.
खाद्य पदार्थांची उघड्यावरच विक्री
नाशिक: शहर परिसरात अनेक दुकाने तसेच हातगाडी, टपरी अशा ठिकाणी खाद्य पदार्थ विक्री केली जाते. परंतु खाद्यपदार्थ उघड्यावर विक्री केली जात असल्याने अशा विक्रेत्यांना समज देण्यात यावी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
जुन्या नाशिकमधील रस्ते नादुरूस्त
द्वारका : जुन्या नाशिक परिसरातील अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी नळाच्या पाईपलाईनसाठी फोडण्यात आलेला रस्ता तसाच असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अंतर्गत रस्त्यावर अनेक ठिकाणी थोड्याथोड्या अंतरावर खड्डे दृष्टीस पडतात. हे खड्डे बुजविण्याची मागणी केली जात आहे.
जिल्हा परिषद मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समोरील भागात दुतर्फा कार पार्किंग होऊ लागल्याने त्या रस्त्यावरुन वाहनांनी जाणाऱ्यांना अनेकदा ट्रॅफिक जामचा अनुभव घ्यावा लागत आहे. नाशिक जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने वाहनधारकांना मोठी अडचण सहन करावी लागत आहे.
अर्धन्यायिक प्रकरणे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे
नाशिक : लोकाभिमुख याेजनेमधील अपिले पडून असल्याबाबतच्या अनेक तक्रारी असल्याने या प्रकरणांमध्ये लवकर निवाडा व्हावा यासाठी अर्धन्यायिक प्रकरणांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. प्रलंबित प्रकरणे आता उपजिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या कामाला गती लाभली आहे.
वाहतूक पोलीस नसल्याचे उल्लंघन
नाशिक : उंटवाडी चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असूनही बेशिस्त वाहनचालकांकडून सिग्नल तोडण्याचे प्रकार वाढले आहेत. या चौकातून सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू राहत असल्याने सिग्नलमुळे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली, मात्र या सिग्नलवर वाहतूक पोलीस नसल्याने दुचाकीस्वार नियमांचा भंग करीत असल्याचे प्रकार घडत आहेत.