नाशिक : हा देश नेमका कोण चालवतो? हे समजण्यापलीकडे आहे. कारण सातत्याने या सरकारकडून घटनेविरुद्ध धोरणे आखून धार्मिक भावना ज्वलंत ठेवत धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता लोकशाहीच्या नीतीमूल्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे लोकशाही भयाखाली सापडली आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले. गीताई फाउंडेशनच्या वतीने आयोजित शहीद गौरी लंकेश एल्गार पुरस्कार पत्रकार दीप्ती राऊत यांना बुधवारी (दि.२०) कांबळे व ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी कांबळे म्हणाले, आपल्या देशात भावना तीव्र अन् स्वस्त: केल्या जात असल्यामुळे माणसाचे जगणे मुश्कील होऊ लागले आहे. ज्या देशात ‘पवित्र’ गोष्टी अधिक वाढतात तो देश नेहमी मागासलेला राहतो, हे लक्षात घेता देशाच्या अशा बिकट आणि धर्मनिरपेक्षतेविरुद्ध तयार झालेल्या वातावरणात पत्रकारितेची जबाबदारी अधिक वाढल्याचे ते म्हणाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्या करून विचार मारण्याचे प्रयत्न एकीकडे होत असताना या विचारांंना जिवंत ठेवत बळ देण्याचे काम गौरी लंकेश एल्गार पुरस्काराच्या माध्यमातून गीताई फाउंडेशनद्वारे केले जात असल्याचे गौरवोद्गार किरण अग्रवाल यांनी यावेळी काढले. सार्वजनिक क्षेत्रात महिलांचा टक्का वाढावा, यासाठी समाजाने पूरक व्यवस्था उभी करण्याची अपेक्षा पुरस्कारार्थी दीप्ती राऊत यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर आहिरे यांनी केले. सूत्रसंचालन अनिता पगारे तर आभार कल्याणी आहिरे यांनी मानले. पत्रकारिता कसोटीच्या वळणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी त्याची गळचेपी होत असल्याने पत्रकारिता कसोटीच्या वळणावर आली आहे. महिलांनी या क्षेत्रात काम करणे अधिक जोखमीचे ठरू पाहत आहे. अशी जोखीम पत्करणार्या गौरी लंकेशची स्मृती जपून तिच्याच पावलावर पाऊल टाकून पत्रकारिता करणाºया दीप्ती राऊत यांना सन्मानित करण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे किरण अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
घटनाबाह्य धोरणांमुळे लोकशाही भयाखाली : उत्तम कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:03 AM