नाशिक : लोकशाहीसाठी जातीभेद आणि वर्गभेद निर्मूलन आवश्यक असून समाजातील जातीभेद, वर्गभेद दूर झाल्याशिवाय लोकशाही अस्तित्वात येणार नाही, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेत दोन दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यासनाचे प्रमुख प्रा. नागार्जुन वाडेकर चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. सुखदेव थोरात बोलत होते. ते म्हणाले, लोकशाही केवळ राजकीय प्रक्रिया नाही. तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. तो पूर्णपणे आत्मसात करणे आवश्यक आहे. दोन दिवस चाललेल्या या चर्चासत्रात ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. उमेश बगाडे, डॉ. यशदत्त अलोने, अन्वर राजन, डॉ. दिलीप चव्हाण आदी मान्यवर सहभागी झाले होते.
या सत्रात डॉ.समाधान बनसोडे, डॉ. राणी जाधव, डॉ. रामचंद्र गायकवाड, संजय पाईकराव, सुनीता सावरकर, अनिता मालविय (मध्यप्रदेश), विठ्ठल जाधव, डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. रक्षा गीता (दिल्ली), डॉ. मनीषा असोरे, डॉ. सचिन ओहोळ, डॉ. सुभाष आहेर यांनी शोधनिबंध सादर केले. प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी चर्चासत्राचे प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले.