सिडको : येथील सिंहस्थनगर भागात टवाळखोर गुंडाचे टोळके सक्रिय झाले असून, बुधवारी रात्रीच्या सुमारास नगरसेविका कावेरी घुगे यांच्या नावाचा दिशादर्शक फलक तोडून नागरिकांच्या घरावर व गाड्यांवर दगडफेक करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत.
सिंहस्थनगर येथे मनपाच्या वतीने नगरसेवक यांच्या घराकडे त्यांच्या नावाने दिशादर्शक फलक लावण्यात आला होता. टवाळखोराने हा लोखंडी फलक तोडून त्यावर दगड मारून तसेच लगतच्या घरांवर तसेच गाड्यांवर दगडफेक केली. अशा गुंडांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून याबाबत पोलिसांना वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात सांगितले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा प्रकार घडण्याची शक्यताही नागरिकांनी वर्तविली आहे. या भागातील स्वामी समर्थ उद्यान, भाद्रपद सेक्टर, सेंट लॉरेन्स हायस्कूलसमोर दहा ते वीस टवाळखोर नेहमी धिंगाणा घालत असतात. पोलिसांनी त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, या गुंडावर कारवाई करण्यासंदर्भात नगरसेविका कावेरी घुगे व लोकनेता प्रतिष्ठाणचे संस्थापक गोविंद घुगे तसेच परिसरातील नागरिकांनी अंबड पोलिसांना निवेदन दिले आहे.