नाशिक : गोवंश हत्त्या बंदी कायदा लागू करून गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता द्यावी या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. संघटनेच्या मुस्लीम आघाडी मोर्चाचे अध्यक्ष शाहिद मुल्तानी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले असून, त्यात हिंदू धर्मीय गोमातेला देव मानतात म्हणून काही समाजकंटक गोमातेच्या नावे हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करतात. त्यामुळे देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होत असून, गोमातेला राष्ट्रीय पशू म्हणून मान्यता देऊन संपूर्ण गोवंश हत्त्या बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी मुस्लीम आघाडी संघटनेने केली आहे. त्याचबरोबर गोमातेची राष्ट्रीय जनगणना करा, गो-मालक, गोशाळा यांच्या गोमाता विक्रीवर बंदी लावून शासकीय परवाना आणावा, नर गोवंशाची कत्तल होण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करावी, जे शेतकरी गोमातेचे पालक पोषण करण्यास असमर्थ ठरतील त्यांनी ती गोमाता छावा संघटनेला कायमस्वरूपी दत्तक द्यावेत आदि मागण्याही करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात मतीन अख्तार, सुभाष गायकर, अर्जुन शिरसाठ, मुश्ताक कुरेशी, करण शिंदे, चेतन अहेर, इक्बाल कुरेशी, युवराज पवार, सोनू महाजन आदि सहभागी झाले. (प्रतिनिधी)
गोवंश हत्त्या बंदीसाठी धरणे आंदोलन
By admin | Published: December 23, 2014 12:54 AM