नाशिक : वीज महापारेषण कंपनीमधील नाशिक परिमंडळांतर्गत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशनने महापारेषण कंपनीच्या सायखेडा रोडवरील मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी ज्येष्ठ नेते विश्राम धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध द्वारसभा घेऊन घोषणाबाजीही करण्यात आली.यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचा-यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, तंत्रज्ञांना पदोन्नतीपासून वंचित ठेवू नये, जादा कामाचा मोबदला देण्यास विलंब करू नये, कर्मचा-यांना पुरविण्यात येणारे सुरक्षिततेचे साहित्य दर्जेदार असावे, पावसाळी साहित्य व गणवेशाचे कापड निवड करताना संघटनेच्या प्रतिनिधी समक्ष करावे, धुळे येथील साहित्य चोरीत सहभागी अधिका-यांवर कारवाई करावी, कर्मचा-यांची प्रलंबित देयके त्वरित अदा करावीत, उपकेंद्रातील प्रकाश देणा-या दिव्यांची संख्या वाढवावी, महिला कर्मचा-यांची कुचंबणा थांबवावी, निवासी गाळ्यांची दुरुस्ती करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी झालेल्या द्वारसभेत घोषणाबाजी करण्यात आली तसेच व्ही. डी. धनवटे, ज्योती नटराजन, अरुण म्हस्के, प्रताप भालके, रोहिदास पवार, विनायक क्षीरसागर, पोपट पेखळे, हरिष सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात प्रमोद घुले, दत्ता चौधरी, रघुनाथ ताजनपुरे, पूनम आहेर, भूषण आहेर यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.