नाशिक : ज्येष्ठ अर्थात वयाच्या साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये विस्मृती हा आजार आढळत असून, साधारणत: पंच्याहत्तरीनंतर सुमारे २५ टक्के व्यक्तींना हा त्रास होतो़ ज्येष्ठांंना हा आजार होऊ नये तसेच शरीराच्या आरोग्याबरोबरच मेंदूचे आरोग्यही चांगले रहावे यासाठी नाशिकमध्ये गत तीन वर्षांपासून ज्येष्ठांसाठी ‘मेमरी क्लब’ सुरू आहे़ ज्येष्ठांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या या क्लबमध्ये शब्दकोडी, गणितीकोडी, सजावट, चित्रकला, उलटे आकडे, उलट्या हाताने काम करणे़, अक्षरावरून शब्द तयार करणे याबरोबरच वैद्यकीय तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित केली जात आहेत़ पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मेमरी क्लिनिकमधील डॉ़ मंगलाताई जोगळेकर यांनी चार वर्षांपूर्वी मेमरी क्लब सुरू केला़ तर नाशिकमध्ये तीन वर्षांपूर्वी सारडा कन्या विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका अनघा ताटके यांनी जोगळेकर यांच्याकडून माहिती घेत पारिजातनगरला या क्लबची सुरुवात केली़ या मेमरी क्लबने गत तीन वर्षांमध्ये तज्ज्ञ डॉ़ महेश करंदीकर, डॉ़ हितेश चौधरी, मानसोपचारतज्ज्ञ अभिजित कारेगावकर यांची व्याख्याने तसेच कार्यशाळेचे आयोजन केले होते़ तसेच मेमरी क्लबतर्फे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत औरंगाबादच्या आस्था फाउंडेशनच्या सुमारे पंधरा तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले होते़साधारणत: वयाच्या साठीनंतर ज्येष्ठांना थोडे-थोडे विसरायला होते, अन् हे विसरणे हळूहळू वाढून त्यांचा परिणाम विस्मृती (डिमेन्शिया) होतो़ नाशिकरोड व पारिजातनगर येथे सुरू असलेल्या या मेमरी क्लबमध्ये सुमारे शंभर सदस्य असून दर महिन्याच्या पहिल्या व तिसºया बुधवारी वृद्धांसाठी शब्दकोडी, गणितीकोडी, चित्रकला, बुद्धीवर्धक अशी योगासने शिकविली जात आहेत़ येत्या काही वर्षांमध्ये डिमेन्शियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत जाणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असून यावर मेमरी क्लब हा चांगला उपाय ठरणार आहे़
‘मेमरी क्लब’ देतोय ज्येष्ठांच्या स्मरणशक्तीला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:23 AM