नाशिक : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे एका पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा नाशिक जिल्हा तेली महासभेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला व निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी नराधमांना अटक करून सदर प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे द्यावा, अशी मागणी करण्यात आली. दुपारी या घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा तेली महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली. दोंडाईचा शहरात नूतन विद्यालयात पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आला. याबाबत शाळा संस्थाचालकांनी पीडितेच्या वडिलांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला. ही बाब अत्यंत संतापजनक असून, या घटनेतील नराधमांना तत्काळ अटक करण्यात यावी, पॉस्को कायद्यांतर्गत तपास व्हावा, खटला शीघ्र न्यायालयात चालविण्यात यावा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी, पीडित मुलीला शासकीय धोरणानुसार तातडीने मदत करण्यात यावी, पीडितेच्या वडिलांवर दबाव टाकल्याप्रकरणी संस्थाचालक, विद्यालयाचे प्रमुख, कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:36 AM