नाशिक: धनगर समाजाला एस.टी संवर्गातील आरक्षण लागू करण्यात यावे तसेच मागील सरकारने दिलेल्या सर्व योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशा मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.धनगड आणि धनगर हा एकच आहे असा अद्यादेश काढून धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती जाहिर करण्याच्या मागणीसाठी समाजाच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकराचे लक्ष वेधण्यासाठी शाुक्रवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकायांना निवेदन सादर करण्यात आले.धनगर समाजाला एस.टीचे दाखले देण्यात यावेत, मागील फडणवीस सरकारने दिलेल्या सवलती कायम करण्यात याव्यात, धनगर समाजासाठी एक हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात यावी, मेंढपाळ कुटूंबियांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, ग्रामीण भागातील समाजातील कुटूंबियांना घरकुले मिळावीत, सारथी संस्थेप्रमाणेच समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्था इथापन करण्यात यावी, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे बांधण्यात यावीत, सन २०१९-२० या आर्थिक वर्षात धनगर समाजासाठी ५०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते त्यांचा समाजाच्या विकासासाठी वापर करण्यात यावा, नवउद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करून दयावे, युवकांना पोलीस, लष्कर भरतीचे प्रशिक्षण मिळावे, चराई अनुदान देण्यात यावे आदि मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.राज्य सरकारकडून कोणतीही सकारामत्क भूमिका घेतली जात नसल्याने समाजाकडून यापुढे तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असा इशाराही निवेदनात देण्यात आलेला आहे.