सटाणा:आश्वासन देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ येथील पालिका कर्मचाºयांनी येथील पालिका कार्यालयासमोर निदर्शने करून येत्या पंधरा दिवसांच्या आत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न केल्यास २७ आॅगष्टपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.यासंदर्भात पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांना निवेदन सादर करण्यात आले. पालिका कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून सर्वमान्य तोडगा निघूनही कार्यवाही न झाल्याने कर्मचाºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतप्त झालेल्या येथील पालिका कर्मचाºयांनी शासनाविरुद्ध घोषणाबाजी करून येथील पालिका कार्यालयासमोर निदर्शने केली.यावेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस पोपटराव सोनवणे यांनी शासनाचा धिक्कार केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाºयांना आश्वासन देऊन एकप्रकारे तोंडाला पाने पुसली आहेत.ही शुद्ध फसवणूक केली असून येत्या पंधरा दिवसांच्या आत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी अन्यथा येत्या २७ आॅगष्टपासून तीन दिवस कामबंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी मुख्याधिकारी हेमलता डगळे ,नगराध्यक्ष सुनील मोरे ,उपाध्यक्षा संगीता देवरे यांना सादर करण्यात आले.याप्रसंगी शाखाध्यक्ष सुभाष सोनवणे ,माधवराव मेने ,अनिल सोनवणे ,सुनील सोनवणे ,विजय सोनवणे ,आस्थापना अधिकारी माणकि वानखेडे ,जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस ,अभियंता शालीमार कोर ,इस्माईल शेख ,दीपक सोनवणे ,दीपक पवार ,मनोहर निकम ,दुर्गेश गायकवाड ,छाया बच्छाव ,बेबी सूर्यवंशी ,जितेंद्र पवार ,कांताबाई पवार आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
सटाणा पालिका कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:56 PM