नाशिक : राज्याच्या आरोग्य विभागातील परिचारिकांना केंद्राच्या आरोग्य विभागाप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू करण्यासोबतच परिचारिकांच्या रिक्त पदांवर तत्काळ भरती करून आयएनसीच्या मानकांप्रमाणे पदांची निर्मिती करून त्याही जागांवर भरतीप्रक्रिया राबविण्याच्या मागणीसह परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनतर्फे नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली.शासकीय रुग्णालयातील परिचारिकांना रुग्णसेवा देताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शासनाने परिचारिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करून रुग्णांना लागणारी औषधे व साधनसामग्रीचा मुबलक पुरवठा करावा, सातव्या वेतन आयोगातील भत्ते देताना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाप्रमाणे नर्सिंग अलाउन्स व इतर भत्ते द्यावे, परिचारिकांना बदलीच्या नियमातून वगळावे, बंधपत्रित परिचारिकांना पूर्वलक्षी प्रभावाने शासनसेवेत सामावून घ्यावे, परिचारिकांना परिचर्येव्यतिरिक्त इतर कामे देऊ नये, परिचारिका संवर्गसाठी स्वतंत्र संचालनालयाची निर्मिती करण्यात यावी, या मागण्याही यावेळी महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनतर्फे करण्यात आल्या असून परिचारिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी निदर्शने करतानाच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा शल्य जिकित्सकांना यासंदर्भातील निवेदनही दिले. यावेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन अध्यक्ष पूजा पवार, सरचिटणीस कल्पना पवार, उपाध्यक्ष शोभा सोनवणे, कार्याध्यक्ष सीमा टाकळकर यांच्यासह लता पाटील, जमुना पवार, रत्ना कुलकर्णी, पौर्णिमा चंद्रात्रे आदी ८० ते १०० परिचारिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.दरम्यान, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी २५ ते ३० परिचारिका नियमितपणे कार्यरत होत्या. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरामुळे अन्य परिचारिकांनी केवळ अर्धा तास निदर्शने करून नियमित सेवेत रुजू होण्याला प्राधान्य दिल्याचे संघटनेच्या अध्यक्षा पूजा पवार यांनी सांगितले.
विविध मागण्यांसाठी परिचारिकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:32 AM