नाशिक : केंद्र शासनाच्या प्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ व विरोधात नाशिक परिमंडळातील वीज कामगार, अभियंते संयुक्त कृती समितीच्या वतीने वीज भवनसमोर काळा दिवस पाळून काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.
ऊर्जा मंत्रालयाने सध्याच्या विद्युत कायद्यामध्ये सुधारणा करून विद्युत (सुधारणा) बिल-२०२० या नावाने नवीन प्रारूप प्रसिद्ध केले आहे. या कायद्यामुळे राज्य सरकारचे व सरकारच्या अधिकाराखालील वीज कंपन्यांचे अधिकार हिरावले जाऊन ते सर्व अधिकार केंद्र सरकारच्या पातळीवर करण्याचे प्रावधान आहे. हे बिल राज्याकरिता, वीजग्राहक, शेतकरी, सामान्य जनतेच्या हिताचे नाही. या कारणास्तव देशातील वीज कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांच्या सर्व संघटनांनी सोमवार, दि.१ जून रोजी या बिलाला विरोध करत ते बिल रद्द करण्याच्या मागणीकरिता काळ्या फिती लावून काम करत निषेध नोंदवून काळा दिवस पाळला. नाशिकरोड येथील विद्युत भवनसमोर सोमवारी वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून काळा दिवस पाळला. यावेळी वर्कस फेडरेशन, इंजिनिअर असोशिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज तांत्रिक कामगार संघटना, वीज कामगार काँग्रेस आदी संघटनाचे व्ही. डी. धनवटे, अरुण म्हसके, महेश कदम, अतुल आगळे, सतीश पाटील, राजू नागपुरे, भास्कर सातव आदी सहभागी झाले होते.(फोटो ०२ वीज) प्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ निदर्शने करताना व्ही. डी. धनवटे, अरुण म्हसके, महेश कदम, अतुल आगळे, सतीश पाटील, राजू नागपुरे, भास्कर सातव आदी.