सिन्नर, दि. 10- प्रस्तावित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यात येण्यासह शेतकऱ्यांच्या हितासाठी २०१३ च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर गुरूवारी सुमारे दोन तास निदर्शनं केली.
समृद्धीबाधीत १० जिल्ह्यातील ३३ तालुक्यातील शेतकरी मुंबई येथे गुरुवार (दि. १०) रोजी मोर्चा काढणार होते. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचं कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे या १० जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने घेण्यात आला होता. त्यानुसार सिन्नरला या निदर्शनं आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. समृद्धी महामार्गबाधीत शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले, राज्य प्रतिनिधी सोमनाथ वाघ, शांताराम ढोकणे, शहाजी पवार, नीलेश गुंजाळ यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून समृध्दीबाधीत गावातील शेतकरी एकत्र येण्यास प्रारंभ झाला होता. समृध्दी महामार्ग रद्द करा, अशा आशयाचा मजकूर लिहिलेल्या टोप्या आंदोलनकर्त्यांनी घातल्या होत्या.
समृध्दी महामार्गासाठी विरोध असणारे विविध आशयाचे फलक घेऊन अनेक महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी ‘समृध्दी महामार्ग रद्द करा, जमिन आमच्या हक्काची; नाही कोणाच्या बापाची, बागायती क्षेत्र वगळा अशा विविध घोषणा देत तहसील कार्यालयाचे प्रांगण दुमदुमून सोडले. त्यानंतर आंदोलनकर्ते तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आले. यावेळी राजू देसले यांच्यासह काही प्रमुख वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.