नाशिक : गंजमाळवरील श्रमिकनगरमध्ये आहे त्याच जागेवर घरकुल बांधून द्यावे, या मागणीसाठी रहिवाशांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोर निदर्शने केली. यावेळी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. वडाळागाव येथील झोपडपट्टी हटविल्यानंतर महापालिकेने आता गंजमाळवरील श्रमिकनगर येथे कारवाई करण्याची तयारी चालविली आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रमिकनगरातील रहिवाशांनी थेट महापालिकेवर धडक मारली आणि दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर जागेवर रहिवासी ५० ते ६० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. महापालिकेने या रहिवाशांना साºया सुविधाही पुरविलेल्या आहेत शिवाय, रहिवासी नियमितपणे घरपट्टीसह विविध कर महापालिकेला जमा करतात. सदर परिसर स्लम म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतही सर्व्हे झालेला आहे. त्यामुळे रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी घरकुले बांधून द्यावीत व कोणतीही मोहीम राबवू नये, अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
श्रमिकनगरमधील रहिवाशांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:20 AM