नाशिकरोड : छत्रपती युवा सेनेच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका येथे विविध मागण्यांसाठी घोषणा देत निदर्शने करण्यात आली.छत्रपती फाउंडेशन संचलित छत्रपती युवा सेनेचे संस्थापक गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी शिंदे येथील टोल नाक्यावर विविध मागण्यांसाठी घोषणा देत निदर्शन आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उपअभियंता सोनवणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुरेवाडी ते सिन्नरफाटापर्यंत विविध सुविधा पुरविण्यात याव्या, सिन्नरफाटा ते चेहेडीपर्यंतचे रस्ता चौपदरीकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, सिन्नर-पुणे बायपास महामार्गावरील माळेगाव एमआयडीसी सिन्नरकडे जाणाऱ्या चौकात दिशादर्शक फलक लावावा, कामगारांना कायमस्वरूपी काम व किमान वेतनानुसार समान काम समान वेतन मिळावे, पावसामुळे नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई द्यावी, नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील वाहनधारकांना टोलमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांकडून शेती मालासाठी टोल आकारणी करण्यात येऊ नये आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. धरणे आंदोलनात छत्रपती युवासेनेच्या राज्य समन्वयक पुष्पाताई जगताप, अण्णासाहेब खाडे, ज्ञानेश्वर भोसले, उमेश मते, शेखर गाडेकर, भिकन राजपूत, तुषार भोसले, मयूर दाते, सागर चव्हाण, नीलेश जाधव, प्रशांत मोरे, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
शिंदे टोल नाका येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:34 AM