नाशिक : नियमित पदोन्नती, रिक्त जागांसाठी त्वरित भरती, नव्याने कार्यान्वित योजनांसाठी अतिरिक्त पदे अशा विविध मागण्यांसाठी समाजकल्याण कर्मचारी संघटनेच्या नाशिक विभागाच्या वतीने समाजकल्याण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसाठी आकृतिबंध निर्माण करणे, नवीन शासकीय वसतिगृहांसाठी पदे मंजूर करणे, अंतिम कार्यवाहीचे अधिकार नसतानाही कर्मचाºयांविरु द्ध विनाकारण केलेले निलंबन मागे घ्यावे, जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत समाजकल्याण विभागाच्या कर्मचाºयांना सेवार्थ प्रणालीतून वेतन दिले जावे, मानधनावरील कर्मचा-यांना कायम करावे, वैद्यकीय देयकांना त्वरित मंजुरी द्यावी अशा विविध मागण्या समाजकल्याण कर्मचारी संघटनेने शासनाकडे वारंवार केलेल्या आहेत. दरम्यान, येत्या बुधवारपर्यंत शासनाकडून विविध मागण्यांसंदर्भात ठोस आश्वासन न मिळाल्यास बेमुदत लेखणी बंद आंदोलन संघटना पुकारणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे, नाशिक विभागीय अध्यक्ष अश्विनी मोरे, उपाध्यक्ष राजेंद्र देवरे, श्रीधर त्रिभुवन, जिल्हाध्यक्ष जयश्री राठोड व सदस्य उपस्थित होते. मागण्यांची कुठल्याही स्तरावर दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी संघटनेने केला. सोमवारपासून दोन दिवस कर्मचाºयांकडून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.
समाजकल्याण कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:35 AM